म्हाडाच्या सदनिकांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्ज नोंदणीस प्रारंभ
म्हाडाची प्रक्रिया पारदर्शक, कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नका : उपमुख्यमंत्री
- पुणे विभागात म्हाडाच्या पाच हजार 647 सदनिका उपलब्ध
पुणे, ता. 10 : "म्हाडा'च्या माध्यमातून नागरिकांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केल्यामुळे "म्हाडा'च्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून, म्हाडाने कोणत्याही मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पाच हजार 647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी प्रारंभ करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सदनिका आणि भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किंमतीत मिळणार आहेत. राज्यातील सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.